Email - reg.rentagreement@legalwing.in

बक्षिसपत्र म्हणजे काय? त्याद्वारे कोणती मालमत्ता देता येते?
लोकांच्या जिव्हाळ्याच्या असेलल्या ह्या दस्ताबद्दल आपण माहिती करून घेवू..
एखाद्या जमिनीचा मालकी हक्क ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. शेतजमीन, घर, फ्लॅट, आदी मालमत्ता जवळच्या नात्यातील व्यक्तीला द्यायची असल्यास भविष्यात होणारे वाद टाळण्यासाठी अधिकृत कागदपत्रे केली जातात. त्यालाच बक्षीसपत्र म्हणतात. बहुतांशी वेळा जवळच्या नात्यामध्ये प्रेमापोटी, आपुलकीपोटी केला जाणाऱ्या ह्या दस्ताबद्दलच्या कायदेशीर तरतुदी ह्या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट च्या कलम १२२ ते १२६ मध्ये अंकित केलेल्या आहेत. त्याची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे
१. स्वतःच्या मालकिची आणि ‘अस्तित्वात’ (existing) असलेली स्थावर किंवा जंगम मिळकत बक्षिस पत्राने तबदील म्हणजेच ट्रान्सफर करता येते. थोडक्यात जी गोष्ट अस्तित्वात नाही तिचे बक्षीसपत्र करता येत नाही.
२. बक्षीस पत्र लिहून देणाऱ्या व्यक्तीस “डोनर” (दाता ) तर ज्याच्या लाभात ते लिहून दिले जाते त्या व्यक्तीस “डोनी” (लाभार्थी) असे म्हणतात.
३. खरेदी खत हे विनामोबदला करता येत नाही. उलटपक्षी बक्षीस पत्र हे “विना-मोबदलाच” असावे लागते. म्हणजेच मिळकतीमधील हक्क तबदील केल्याच्या बदल्यात डोनरला डोनी कढून कुठलाही मोबदला मिळत नाही. तसेच काही अटींना अधीन राहून म्हणजेच “कंडिशनल” बक्षीस पत्र देखील करता येते.
४. स्थावर (इममुव्हेबल) मिळकतीचे बक्षीसपत्र हे नोंदणीकृत करणे म्हणजेच “रजिस्टर” करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यावर डोनर, तसेच २ साक्षीदारांनी सही करणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे डोनीने देखील “बक्षीस पात्र मान्य आहे” असे लिहून सही करणे गरजेचे आहे. ह्या अटींची पूर्तता झाली की बक्षीस पत्राद्वारे मालकी हक्क तबदील होतो. जंगम (मुव्हेबल) मिळकतीचे बक्षिसपत्र हे नोंदणीकृत दस्ताने किंवा प्रत्यक्ष त्या वस्तूचा ताबा देऊन करता येते.
बक्षिस पत्र आणि 💸 मुद्रांक शुल्क किती?
महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट अन्वये बक्षीसपत्र नोंदविण्यासाठी जी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. सदरील कायद्याच्या अनुच्छेद ३४ अन्वये, जर का डोनरच्या कुटुंबातील सदस्यांना म्हणजेच नवरा, बायको, भाऊ किंवा बहीण ह्यांना बक्षीसपत्राद्वारे मिळकत द्यायची असेल तर त्या मिळकतीच्या बाजारभावाच्या तीन टक्के इतकी स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. मात्र जर का सदरील मिळकत ही राहण्याची किंवा शेतीची असेल आणि बक्षीस पत्राद्वारे ती मिळकत नवरा, बायको, मुलगा, मुलगी, नातू, नात, मृत मुलाची पत्नी ह्यापैकी कोणाला द्यायची असेल तर केवळ दोनशे रुपये इतकीच स्टॅम्प ड्युटी आकारली जाईल. ह्या उपर इतर सर्व बक्षीसपत्रासाठी खरेदीखताप्रमाणे पूर्ण स्टॅम्प ड्युटी आकारली जाईल. ह्या मध्ये एक श्लेष असा आहे कि अजूनही पुण्यामध्ये स्टॅम्पड्युटी व्यतिरिक्त एक टक्का एल.बी.टी देखील आकारला जातो. असो .
५. बक्षीस पत्र ‘अपवादात्मक’ परिस्थितीमध्येच रद्द करता येते. जर एखादी विशिष्ट गोष्ट समजा घडली तर बक्षीस पत्र रद्द होईल, असे जर डोनर आणि डोनी ह्यांनी ठरविले असेल आणि तशी गोष्ट घडली तरच बक्षिस पत्र रद्द होऊ शकते. मात्र अशी विशिष्ट गोष्ट घडणे किंवा न घडणे ह्यावर डोनरचे नियंत्रण असेल, तर असे बक्षीसपत्र रद्द करता येत नाही. तसेच ज्याप्रमाणे एखादा करार रद्द करता येतो त्या कारणांनी देखील बक्षीपत्र रद्द करता येते.